Tuesday, January 2, 2018

विवेकचूडामणि श्लोक २ रा


या जगात मानव म्हणून जन्म घेणे हे अवघड आहे. त्यातील अवघड गोष्टी केवळ पूर्व-पुण्याईनेच प्राप्त होतात असे पुढील श्लोक सांगतो.


जंतूनां नर-जन्म दुर्लभमतः पुस्त्वं ततो विप्रता
तस्माद् वैदिक-धर्म-मार्ग-परता विद्‌द्वत्त्वमस्मात् परम् ।
आत्मानात्म-विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थिति-
र्मुक्तिर्नो शत-जन्म-कोटि-सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते ॥ २ ॥


प्राण्यांच्या बाबतीत मनुष्य-जन्म मिळणे हे दुर्लभ आहे. त्याच्यापेक्षा पुरुष म्हणून जन्म घेणे हे अधिक दुर्लभ आहे. त्याच्यापेक्षा विप्र म्हणून जन्म हा दुर्लभ आहे. त्याहीपेक्षा वेदांनी सांगितलेल्या धर्ममार्गात तत्परता /आवड ही दुर्लभ आहे; त्याच्यापेक्षा विद्वत्ता असणे हे आणखी दुर्लभ आहे. या दुर्लभ गोष्टींचा सदुपयोग करून आत्मा आणि अनात्मा यांतील फरक जाणणे, नंतर आत्म्याचा स्वतः चांगला अनुभव घेणे, त्यानंतर ब्रह्मस्वरूपात म्हणजेच आत्मस्वरूपात मिसळून राहणे म्हणजेच मुक्ती, या गोष्टी दुर्लभ आहेत. शेकडो कोटी जन्मात केलेल्या पुण्याशिवाय मुक्ती मिळत नाही.

या श्लोकात सांगितलेल्या दुर्लभ गोष्टी अशा आहेत : - (१) मनुष्य म्हणून जन्म घेणे अवघड आहे. पूर्व कर्मांनुसार प्राणी ८४ लक्ष योनीत जन्माला येत असतो. पुढे ''एकेका योनि कोटि कोटि फेरा । नरदेहाचा वारा मग लागे ॥'' या वचनावरून माणूस म्हणून जन्म मिळणे किती अवघड आहे हे लक्षात येते. मनुष्य जन्मातच मोक्ष मिळू शकतो; मोक्ष हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. हा मनुष्यजन्म मिळणे कठीण आहे. (२) माणूस हा पुरुष, स्त्री, नपुंसक म्हणून जन्मास येऊ शकतो. त्यामध्ये पुरुष म्हणून जन्म मिळणे हे अवघड आहे. पुरुषजन्माला इतके महत्त्व का ? उत्तर असे दिसते. पुरुषाचे ठिकाणी धैर्य आणि स्थैर्य हे गुण प्रामुख्याने दिसतात. हे गुण मोक्षप्राप्तीस उपयोगी पडतात. म्हणून पुरुषजन्माला महत्च दिले गेले. आणखी असे दिसते की, मोक्षशास्त्र लिहिणारे बहुतेक सर्व पुरुष होते. साहजिकच त्यांनी पुरुषजन्माला महत्त्व दिले. मग प्रश्न असा की, स्त्रिया आणि नपुंसक हे मोक्षाला अधिकारी नाहीत काय ? उत्तर आहे की, ते अधिकारी आहेत. तथापि, पुरुषांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण नगण्य म्हणण्याइतके कमी आहे. साहजिकच त्यांचा स्वतंत्र निर्देश केलेला दिसत नाही. (३) विप्र म्हणून पुरुष जन्म घेणे हे अवघड आहे. शंकराचार्य हे भारतीय होते. म्हणून त्यांनी भारतीय कल्पनेनुसार विष्णू, वेद, धर्म इत्यादींचा निर्देश केला आहे. एकेकाळी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण होते. त्यातील पहिल्या तीहींना विप्र म्हणत. शूद्र, चांडाळ इत्यादीपेक्षा विप्रत्व चांगले. प्राचीन भारतात वर्णव्यवस्था धर्मशास्त्रानुसार होती. धर्मशास्त्रांना वेद हे प्रमाण होते. वेदांना अनुसरून असणाऱ्या धर्मशास्त्रांनी चार वर्ण आणि चार आश्रम यांची कर्तव्ये सांगितली होती. विप्र म्हणून जन्म आला तरी वेदानुसार धर्माचरण करणे हे महत्त्वाचे होते. येथे प्रश्न असा - त्रैवर्णिकाखेरीज समाजातील इतर लोक मोक्षाधिकारी नव्हते काय ? याचे उत्तर असे - केवलाद्वैत वेदांतानुसार जो कोणी साधन-चतुष्टय-संपन्न आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. तेव्हा इतर लोकांनी पूर्वजन्मी वेदाचा अभ्यास व आचरण केले असले तरी चालते. या संदर्भात 'वेदांतसार ' हा ग्रंथ सांगतो - 'अधिकारी तु विधिवद् अधीत-वेद-वेदांगत्वेन आपाततः अधिगत-अखिलवेदार्थः अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा । ' आणखी असे - स्त्रियांप्रमाणेच शूद्र इत्यादी तुरळकपणेच मोक्ष मिळविणारे होते असे दिसून येते. तसेच मोक्षशास्त्रावर लिहिणारे बहुतेकजण त्रैवर्णिक असल्याने त्यांनी इतरांकडे दुर्लक्ष केले असावे. आणखी असे - विप्रत्व हा शब्द सत्त्वगुण सुचवितो असे म्हटले तर शूद्र इत्यादी सात्त्विक स्वभावाचे असतील तर ते मोक्षाधिकारी होऊ शकतात. (४) पहिल्या तीन वर्णांतील सर्वचजण वेदाचे अध्ययन करीत, असे नव्हते. वेदाला अनुसरून धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या धर्माचे आचरण केल्याने चित्त शुद्ध होण्यास मदत होते आणि चित्तशुद्धी ही मोक्षमार्गावर आवश्यक आहे. म्हणून वेदप्रणीत धर्माचे आचरण महत्त्वाचे ठरते. (५) मोक्षासाठी आत्मानात्मविवेक हा अति आवश्यक आहे. तो येण्यास विद्वत्ता हवी. ग्रंथांचे श्रवण, मनन, इत्यादींच्याद्वारा विवेकबुद्धी येणे म्हणजे विद्वत्त्व. साधकबाधक गोष्टींचा विचार करून काहीतरी निश्चय करणारा विद्वान असतो. या विद्वत्तेलाच पुढे श्लोक ४ मध्ये ''श्रुति-पार-दर्शन'' असे म्हटले आहे. असली विद्वत्ता मोक्षमार्गात आवश्यक आहे. (६) वरील दुर्लभ गोष्टी मिळाल्याने सर्व काम भागत नाही. 'आत्मा हा एकमेव एक अंतिम सत्यतत्त्व आहे आणि बाकी सर्व अनात्मा आहे', ही गोष्ट पटणे व मनात ठसणे आवश्यक आहे. आत्मा नित्य आहे. अनात्मा अनित्य आहे. अनात्मा असणारे विश्व अनित्य आहे. हे पटले तर विश्वातील अनित्य वस्तू-विषयीची आसक्ती दूर होऊन वैराग्य येईल. वैराग्य ही मोक्षाची पहिली पायरी आहे. त्यासाठी आत्मानात्मविवेक दृढ होणे नितांत आवश्यक आहे. (७) उपनिषदांच्या अभ्यासाने कळते की नित्य असणारा आत्मा अंतिम सत्यतत्त्व आहे आणि तोच आपला आत्मा - अंतरात्मा - आहे. पण या शाब्दिक ज्ञानाचा उपयोग नाही. हा आत्मा सच्चिदानंद आहे. आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येणे गरजेचे आहे. कारण अनुभव हीच खात्री. (८) हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. आत्मानुभव म्हणजेच ब्रह्मानुभव. या ब्रह्मानुभवाने ब्रह्माचा अनुभव घेणारा ब्रह्मरूप होऊन जातो (ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति । ). असे ब्रह्मरूप होऊन जाणे, ब्रह्मरूपाने राहणे हाच मोक्ष आहे (ब्रह्मभावश्च मोक्षः । ).

मोक्ष म्हणजे तरी काय ? संसाराच्या बंधनातून सुटका म्हणजे मोक्ष. संसार म्हणजे जन्ममरणाचा फेरा. तेव्हा संसारातून सुटका म्हणजे जन्ममरणातून सुटका. मोक्षात जीव ब्रह्मरूप होतो. ब्रह्म हे सच्चिदानंद आहे. म्हणून ब्रह्मानंदाची प्राप्ती म्हणजेच परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे. संसारातील सुखदुःखांचा अभाव म्हणजे परमानंद नव्हे, तर नित्य निर्विषय आनंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे आणि मोक्ष मिळविणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.

अनेक दुर्लभ गोष्टी मिळत गेल्यास माणूस दुर्लभ मोक्ष मिळवू शकतो. साहजिकच एकाच जन्मात मोक्ष मिळेल असे नाही. गीतेने म्हटल्याप्रमाणे 'अनेक्तजन्म-संसिद्ध' असा पुरुष मोक्षसिद्धी प्राप्त करून घेतो. येथे प्रश्न असा - शंकराचार्य, ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी, एकनाथ महाराज हे एकाच जन्मात मुक्त झाले असे दिसते. ते कसे काय ? याचे उत्तर नामदेव महाराजांनी दिले आहे - 'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥'

प्रस्तुतच्या श्लोकात असे म्हटले आहे - 'शेकडो कोटी जन्मात चांगल्या प्रकारे केलेल्या पुण्यकर्मांनी मुक्ती मिळते. येथे 'चांगला प्रकार' हे शब्द महत्त्वाचे आहेत. उदा., दान देणे हे पुण्य आहे पण ते दान त्रागा करून, आदळआपट करून, वाईट तोंड करून देणे हा प्रकार चांगला नव्हे. तर 'दान हे आवश्यक आहे', इत्यादी चांगली बुद्धी बाळगून दान करावयास हवे म्हणजे चांगला प्रकार होईल.

केवलाद्वैतमतानुसार कोणत्याही प्रकारच्या कर्मांनी मोक्ष मिळत नाही (पहा श्लोक ७, ११, ५८, इत्यादी) मग येथे पुण्यकर्मांनी मोक्ष मिळतो असे का म्हटले आहे ? या प्रश्नाचे उत्तर असे - साक्षात् कर्मांनी मोक्ष मिळत नाही. तथा, चांगल्या कर्मांनी मोक्षासाठी आवश्यक पण दुर्लभ अशा ज्या गोष्टी या श्लोकात सांगितल्या आहेत, त्या मिळू शकतात. तसेच कर्मांनी चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी ही आवश्यक बाब आहे. अशाप्रकारे कर्मे ही अप्रत्यक्षपणे मोक्षप्राप्तीला उपयोगी ठरतात.

आणखी एक प्रश्न असा - श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांनी ब्रह्मसाक्षात्कार होऊन मोक्ष मिळतो असे या ग्रंथातच पुढे सांगितले आहे. मग प्रश्न असा - श्रवण इत्यादी कर्मे नाही काय ? याचे उत्तर असे - तांत्रिकदृष्ट्या श्रवण इत्यादी कर्मे आहेत. पण ती मोक्षासाठी असल्याने आणि ती कर्माच्या बंधनात पाडीत नसल्याने, ती नेहमीच्या 'कर्म' या सदरात गणली जात नाहीत. जसे - इच्छा ही बंधनात पाडणारी आहे पण मोक्षाची इच्छा ही इच्छा असली तरी ती बंधनात पाडीत नाही म्हणून ती नेहमीच्या 'इच्छा' या वर्गात मोडत नाही.

आणखी असे - येथे 'शेकडो कोटी जन्मातील पुण्य' असे म्हटल्याने ते पुण्य 'अनंत' होते. मग ते 'पुण्य' या नेहमीच्या सदरात पडत नाही. अगणित अथवा अनंत पुण्य हे नेहमीच्या 'पुण्य' या वर्गात पडत नाही. त्यामुळे 'अनंत पुण्याने मोक्ष' असे म्हटले तरी बिघडत नाही.

No comments:

Post a Comment