Monday, January 8, 2018

विवेकचूडामणि श्लोक ८ वा

द्रव्य आणि कर्म यांनी मोक्ष मिळत नाही. पण योग्य पद्धतीने प्रयत्‍न केल्यावर मोक्ष मिळू शकतो. 

अतो विमुक्त्यै प्रयतेत विद्वान्
    संन्यस्त-बाह्यार्थ-सुख-स्पृहः सन् ।
संतं महांतं समुपेत्य देशिकं
    तेनोपदिष्टार्थ - समाहितात्मा ॥ ८ ॥

म्हणून बाह्य अशा (शब्द, स्पर्श, इत्यादी) पदार्थांतून सुख मिळेल ही आशा टाकून, महान् संत अशा गुरूजवळ जाऊन, त्याने उपदेशिलेल्या गोष्टींवर मन (आत्मा) एकाग्र करून, शहाण्या माणसाने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्‍न करावयास हवा.

विमुक्ती म्हणजे मुक्ती अथवा मोक्ष. कर्माने मोक्ष मिळत नाही, असे श्लोक ६ मध्ये सांगितले आणि येथे मोक्षासाठी प्रयत्‍न करावा असे सांगितले. आता प्रयत्‍न म्हणजे कर्म आहेच की ! मग कर्माने मोक्ष मिळत नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे ? या प्रश्नाचे उत्तर असे - श्रुतिस्मृतींनी सांगितलेल्या कर्मांनी तसेच लौकिक कर्मांनी मोक्ष मिळत नाही हे खरेच आहे. तथापि, श्रवण, मनन व निदिध्यासन यांच्या प्रयत्‍नाने मुक्ती मिळते आणि ते मोक्षासाठी असल्यामुळे त्यांना कर्म म्हटले जात नाही. जसे - मुमुक्षा ही इच्छा आहे, पण ती मोक्षासाठी असल्याने ती इच्छा मानली जात नाही, कारण जी जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडणारी नाही.

मोक्षासाठी प्रयत्‍न करण्यापूर्वी योग्य ती पूर्वतयारी आवश्यक आहे. जसे - भात करण्यापूर्वी तांदूळ, पाणी, अग्नी इत्यादी जमविणे आवश्यक आहे. मुक्तीसाठी प्रयत्‍न करण्यापूर्वी पुढील तीन गोष्टी आवश्यक आहेत असे येथे सांगितलेले आहे - (१) शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे बाह्य पदार्थ नाशवंत असल्यामुळे त्यांच्यापासून सततचे सुख मिळणार नाही हे जाणून, त्यांच्याविषयीची आसक्ती दूर व्हावयास हवी, म्हणजेच वैराग्य हवे. (२) ज्या आत्मज्ञानाने मोक्ष प्राप्त होणार आहे, ते ज्ञान गुरूकडून संपादन करून घ्यावयास हवे. अशा गुरूचा शोध घ्यावयास हवा. (३) गुरूने सांगितलेले खरे आहे अशीच श्रद्धा ठेवून (श्लोक २६) त्याने सांगितलेल्या गोष्टींचे एकाग्र मनाने चिंतन करून (मनन), ते ज्ञान मनात ठसवून ठेवावयास हवे.

केवलाद्वैत वेदांत हा अगदी अडाणी माणसांसाठी नाही. ज्याने थोडेफार आध्यात्मिक ज्ञान मिळविले आहे, ज्याला उपनिषदांतील वचनांचा वरवरचा का होईना अर्थ माहीत आहे, असा माणूस येथे 'विद्वान् ' शब्दाने अभिप्रेत आहे. त्या माणसाने हे ज्ञान चालू जन्मात अथवा पूर्वजन्मांत (जन्मांतर) मिळविले असेल तरी चालते. 

श्लोक ३ मध्ये ज्याला 'महापुरुष' म्हटले होते त्यालाच येथे ''संतं महांतं'' असे म्हटले आहे. योग्य त्या पद्धतीने अशा महान् संताकडे जावयाचे आहे. हा महापुरुष ब्रह्मात स्थित आणि ब्रह्मसाक्षात्कारी आहे. तसेच हा गुरू श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हवा असेही सांगितले जाते (श्लोक ३४). मोक्षमार्ग कळण्यास गुरूची आवश्यकता आहे, ही गोष्ट 'आचार्यवान् पुरुषो वेद' या शब्दांत उपनिषदांनी सांगितलेली आहे.

No comments:

Post a Comment