Saturday, January 6, 2018

विवेकचूडामणि श्लोक ६ वा

मोक्ष हे स्वतःचे हित कशाने प्राप्त होते आणि कशाने होत नाही ते आता सांगितले आहे. 

वदंतु शास्त्राणि यजंतु देवान्
    कुर्वंतु कर्माणि भजंतु देवताः ।
आत्मैक्य-बोधेन विनापि मुक्ति-
    र्न सिध्यति ब्रह्म-शतांतरेऽपि ॥ ६ ॥

या जगातील लोक अनेक शास्त्रे उच्चारू देत, अनेक देवांची पूजा करू देत अथवा अनेक देवांसाठी यज्ञ करू देत, अनेक चांगली/शुभ कर्मे करू देत, अनेक देवतांचे भजन करू देत अथवा अनेक देवतांचा आश्रय घेऊ देत, तथापि प्रत्यग् आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत; हे ज्ञान झाल्याविना, शेकडो ब्रह्मदेव होऊन गेले तरीसुद्धा मुक्ती प्राप्त होत नाही.

या जगात माणसे निरनिराळ्या गोष्टी करीत असतात; पण त्यांच्या योगे त्यांना मोक्ष मात्र मिळत नाही. उदा., काही लोक शास्त्रे शिकतात, त्यांचे स्पष्टीकरण करतात; त्यामुळे त्यांना विद्वान् म्हणून मान मिळेल पण मोक्ष मिळणार नाही.

काहीजण देवांसाठी यज्ञ करतात; त्यामुळे त्यांना फारतर स्वर्ग मिळेल. काहीजण किरकोळ गोष्टींच्या प्राप्तीसाठी देवदेवतांची पूजा-अर्चा करतात. त्यांच्या त्या त्या इच्छा पूर्ण होतील. शास्त्रे आणि वडीलधारी माणसे सांगतात म्हणून दान देणे, विहिरी-तलाव खणून घेणे, इत्यादी चांगली कर्मे काहीजण करतात; त्यामुळे त्यांना पुण्य मिळेल. कित्येक लोक विशिष्ट कारणासाठी गौण देवतांचा आश्रय घेतात; त्यांचे भजन, पूजन, स्मरण करतात, मग त्यांच्या इष्ट गोष्टी त्यांना मिळतात. पण या सर्व कर्मांनी मोक्ष मात्र मिळत नाही. मोक्ष प्राप्त होण्यास एकच साधन आहे आणि ते म्हणजे जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान. हे ज्ञान नसेल तर कितीही प्रदीर्घ काळ गेला तरी माणसाला मुक्ती प्राप्त होत नाही.

येथे प्रदीर्घ काळ दाखविण्यास 'शेकडो ब्रह्मदेव' असे म्हटले आहे. मानवी काल आपल्याकडे कृत, त्रेता, द्वापार आणि कलि या चार युगांत मोजला जातो. या युगांच्या बेरजेच्या कितीतरी पटीने ब्रह्मदेवाचे आयुष्य आहे; ते कोट्यवधी वर्षांत मोजले जाते. ब्रह्मदेवाची अशी शेकडो आयुष्ये होऊन गेली तरी वर उल्लेखिलेल्या कर्मांनी मोक्ष मिळत नाही. ते मोक्षाचे मार्ग नाहीत. मोक्षप्राप्त करून घेण्याचा ज्ञान हा एकच मार्ग उपनिषदांनी सांगितलेला आहे (ज्ञानादेव तु कैवल्यम् । ) हे ज्ञान व्यावहारिक ज्ञान नव्हे. हे ज्ञान म्हणजे जीव आणि ब्रह्म/आत्मा एकच आहेंत हे ज्ञान होय. व्यवहारात आपण देह, इंद्रिये, मन इत्यादींना आत्मा मानत असतो. खरे म्हणजे आपण स्वतः आत्मा/प्रत्यगालत्मा आहोत, परंतु अध्यासाने आपण देह इत्यादींना 'आपण' आहोत असे म्हणत असतो. केवलाद्वैत मतानुसार, 'मी' या शब्दाने अंतरात्मा सूचित होतो आणि हा अंतरात्मा आणि परमात्मा/ब्रह्म हे एकच आहेत. (तथाकथित जीव हा प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब असल्याने त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही.) हे ज्ञान झाले तर जीव ब्रह्मरूप होतो आणि तोच मोक्ष आहे. म्हणून ''ब्रह्मात्मैकत्व-बोधेन मोक्षः सिध्यति नान्यथा ''असे या ग्रंथातच (श्लोक ५८) पुढे सांगितले आहे. भावार्थ असा - अन्य काही करून उपयोग नाही. जीव ब्रह्माचे ऐक्य ज्ञान झाल्याविना मोक्ष नाही. येथे एक लक्षात ठेवावे - जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचे शाब्दिक ज्ञान मात्र उपयोगी नाही, तर तसे अनुभवजन्य ज्ञान हवे.

No comments:

Post a Comment