Monday, January 15, 2018

विवेकचूडामणि श्लोक १५ वा

विचार करण्यापूर्वी योग्य तो हितकर्ता गुरू प्राप्त करून घ्यावयास हवा. 

अतो विचारः कर्तव्यो जिज्ञासोरात्म-वस्तुनः ।
समासाद्य दया-सिंधुं गुरु ब्रह्मविदुत्तमम् ॥ १५ ॥

उत्तम ब्रह्मवेत्ता/ब्रह्मसाक्षात्कारी आणि दयेचा सागर असा गुरू प्राप्त करून घेऊन, आत्मवस्तू जाणून घेऊ इच्छिणाऱ्या पुरुषाने गुरूच्या वचनाला अनुसरून विचार करावयाचा आहे.

जो हितकर्ता गुरू शोधावयाचा आहे तो ब्रह्मवेत्ता हवा. जर गुरूच ब्रह्म जाणणारा नसेल तर तो ब्रह्मजिज्ञासू शिष्याला काय सांगू शकेल ? तसेच ब्रह्मवेत्ता गुरू दयाळू हवा. त्याला ब्रह्मजिज्ञासू शिष्याची करुणा आली तर तो त्याच्या कल्याणासाठी त्याला आत्मोपदेश करील. पण केवळ त्या उपदेशाचे श्रवण करून भागणार नाही. गुरूच्या उपदेशाचा विचार/चिंतन/मनन होणे आवश्यक आहे. तरच ते गुरूपदिष्ट ज्ञान मनात ठसून राहील.

Sunday, January 14, 2018

विवेकचूडामणि श्लोक १४ वा

विचाराने आत्मज्ञान होते पण हा विचार करणाऱ्या माणसाजवळ काही पात्रता आणि साहाय्यकारी गोष्टी लागतात. 

अधिकारिणमाशास्ते फल-सिद्धिर्विशेषतः ।
उपाया देश-कालाद्याः सत्यस्मिन् सहकारिण ॥ १४ ॥

मोक्षरूपी/उरात्मज्ञानरूपी फळाच्या सिद्धीसाठी विशेषकरून अधिकारी/पात्र व्यक्तीची अपेक्षा असते आणि त्या संदर्भात (अस्मिन्) देश, काल, इत्यादी हे सहायभूत असतात.

या जगात सर्वांसाठी सर्व नाही. साहजिकच आत्मज्ञान हे वाटेल त्या व्यक्तीला होत नाही. ज्या व्यक्तीजवळ विशिष्ट पात्रता आहे त्या व्यक्तीला हे ज्ञान होते. (ही पात्रता पुढे श्लोक १७-२८ मध्ये सांगितली आहे.) लौकिक व्यवहारातही अधिकार/पात्रता/योग्यता पाहिली जाते. तसेच या संदर्भात देश, काल इत्यादी पुढीलप्रमाणे उपयोगी ठरतात - अधिकारी पुरुषाने गुरूजवळ जाऊन आणि राहून (देश) त्याच्याकडून योग्य त्या मार्गाने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे आहे. मग गुरू जेव्हां प्रसन्न होईल (काळ) तेव्हा ज्ञान मिळेल. गुरू प्रसन्न होण्यास शिष्याचा विनय, सेवा (आद्याः) इत्यादी गोष्टी साहाय्यकारी होतात (श्लोक ३६ पहा).

Saturday, January 13, 2018

विवेकचूडामणि श्लोक १३ वा

आत्म्याविषयी योग्य विचार कसा करावयाचा ते पुढील श्लोक सांगतो. 

अर्थस्य निश्चयो दृष्टो विचारेण हितोक्तितः ।
न स्नानेन न दानेन न प्राणायाम-शतेन वा ॥ १३ ॥

आप्ताच्या (हित) वचनाला अनुसरून विचार केल्याने श्रेष्ठ वस्तू (अर्थ) काय आणि कशी आहे याचा निश्चय होतो असे दिसून येते. हा निश्चय स्नान, दान किंवा शेकडो प्राणायाम यांच्याद्वारा होऊ शकत नाही.

विचाराने आत्मवस्तूचे ज्ञान होते हे खरे पण हा विचार आपले हित करू शकणाऱ्या पुरुषाच्या वचनाला अनुसरून व्हावयास हवा. हा हितकारक पुरुष म्हणजे आपला गुरू (श्लोक ८ पहा). गुरूला आत्मसाक्षात्कार झाला आहे. साहजिकच विचार कसा करावा हे तोच सांगू शकतो. त्याच्या वचनाला अनुसरून विचार झाला असता आत्मवस्तूचे निश्चित ज्ञान होऊ शकते. येथे हित म्हणजे व्यावहारिक हित करू इच्छिणारा पुरुष असा मात्र अर्थ नाही.

कितीही कर्मे केली तरी मोक्षदायक ज्ञान होत नाही. तीर्थक्षेत्री जाऊन त्रिकाल स्नाने केली अथवा कोट्यवधी दाने दिली तरी पुण्यप्राप्ती होईल पण आत्मवस्तूचे ज्ञान होणार नाही. तसेच शेकडो वेळा प्राणायाम केला तर फार तर शरीरशुद्धी, नाडीशुद्धी होईल पण आत्मवस्तूचे ज्ञान मात्र कधीच होणार नाही.

Friday, January 12, 2018

विवेकचूडामणि श्लोक १२ वा

विचाराने आत्मवस्तूची प्राप्ती कशी होते हे एक उदाहरण घेऊन पुढील श्लोक १२ सांगतो. 

सव्यग्र विचारतः सिद्धा रज्जु-तत्त्वावधारणा ।
भ्रांतोदित-महासर्प-भय-दुःख-विनाशिनी ॥ १२ ॥

योग्य विचार केल्याने रज्जूच्या खऱ्या स्वरूपाचा निश्चय होतो आणि भ्रांतीने त्या रज्जूवर भासणाऱ्या मोठ्या सर्पामुळे वाटणारे भय आणि दुःख नष्ट होऊन जाते.

या श्लोकात रज्जूसर्प दृष्टांत सांगितलेला आहे. केवलाद्वैत वेदांतात हा दृष्टांत वरचेवर येतो. तो असा - जमिनीवर एक लांब दोरी-रज्जू वेडीवाकडी पडलेली होती. अंधूक प्रकाशामुळे ती कुणालातरी रज्जू म्हणून कळली नाही. म्हणून तेथे रज्जू नसून साप आहे अशी - भ्रांती- चुकीचे ज्ञान - झाले. मग तो सर्प चावेल अशी भीती वाटली आणि मनात दुःख झाले. पण पुढे विचार केल्यावर तेथे रज्जू आहे असे कळले ते विचाराने. जर हा साप असता तर तो स्वस्थ न बसता हलला असता, त्याने फणा काढला असता, त्याने फूत्कार केला असता. पण येथे दिसणारा हा साप तसले काहीच करीत नाही आहे. तेव्हा येथे साप नाही. येथे सापासारखी वाटणारी रज्जू पडलेली दिसते. असा योग्य विचार केल्यावर येथे साप नसून रज्जूच पडलेली आहे असे रज्जूचे खरे स्वरूप कळून आले आणि मग रज्जूचे स्वरूप कळताच साप आहे असे वाटल्यामुळे निर्माण झालेली भीती आणि दुःख नष्ट होऊन गेले. याचप्रमाणे योग्य विचार केला तर आत्मवस्तूचे खरे स्वरूप कळून येते आणि आत्म्यावर भ्रांतीने भासणाऱ्या संसाराची भीती आणि संसारातील दुःख संपते.

Thursday, January 11, 2018

विवेकचूडामणि श्लोक ११ वा

जर कर्मांनी मोक्ष मिळत नाही तर श्रुति-स्मृतींनी कशासाठी कर्मे सांगितली आहेत ? या प्रश्नाचे उत्तर देऊन, कर्मांनी मोक्ष मिळत नाही, असे श्लोक ११ सांगतो. 

चित्तस्य शुद्‌धये कर्म न तु वस्तूपलब्धये ।
वस्तु-सिद्धिर्विचारेण न किंचित् कर्म-कोटिभिः ॥ ११ ॥

चित्ताच्या शुद्धीसाठी उपयोगी म्हणून कर्म सांगितलेले आहे; कर्म हे ब्रह्म/आत्मा वस्तूच्या उपलब्धीसाठी उपयोगी पडणारे नाही. आत्मवस्तूची प्राप्ती ही विचाराने होते, कोट्यवधी कर्मे करूनही होत नाही.

श्रुति-स्मृतींनी जी काही कर्मे सांगितली आहेत, ती चित्ताच्या शुद्धीसाठी उपयोगी पडतात. निष्कामपणाने केल्या जाणाऱ्या कर्मांनी चित्ताची शुद्धी होते म्हणजे चित्तातील काम, क्रोध इत्यादी विकार बाजूला जातात. शुद्ध झालेल्या चितात ज्ञान प्रगटते आणि मग त्या आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो. आत्मप्राप्तीच्या संदर्भात कोट्यवधी कर्मेही निष्कळ ठरतात.

आत्मा/ब्रह्म या परमोच्च तत्त्वाला 'वस्तू'असे म्हटले जाते. वस्तू म्हणजे सतत सदोदित नित्य असणारा पदार्थ. अशी वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे आत्मा अथवा ब्रह्म. या आत्मवस्तूची प्रगती विचाराने म्हणजे विचारजन्य ज्ञानाने होते. ''विचारात जायते ज्ञानम्'' असे पंचदशीकाराचे वचन आहे. आत्मवस्तूचा विचार म्हणजे चिंतन/मनन झाले की आत्मज्ञान होते. आत्मज्ञानाने/ब्रह्मज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती होते. ''ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति'' असे एक उपनिषद सांगते.

Wednesday, January 10, 2018

विवेकचूडामणि श्लोक १० वा

केवळ वैराग्याने काम भागत नाही, तर - 

संन्यस्य सर्व-कर्माणि भव-बंध-विमुक्तये ।
चिंत्यतां पंडितैर्धीरैरात्माभ्यास उपस्थितैः ॥ १० ॥

संसाराच्या बंधनातून सुटण्यासाठी, सर्व कर्मांचा त्याग करून, प्रत्यग् आत्म्याच्या (ज्ञानासाठीच्या) प्रयत्‍नात तत्पर असणाऱ्या विचारी (धीर) शहाण्या माणसांनी आत्म्याचे चिंतन करावयास हवे.

भव म्हणजे संसार, जन्ममरणाचे रहाटगाडगे. जन्ममरण हे कर्मांमुळे येते. कर्मांमुळे माणूस जन्ममरणात म्हणजे संसारात बद्ध होतो. म्हणून कर्मांनी मोक्ष मिळत नाही असे मागे श्लोक ७ मध्ये सांगितले होते. म्हणून आसक्ती आणि अहंकार यांनी युक्त असणाऱ्या सर्व कर्मांचा त्याग व्हावयास हवा. नंतर आत्मज्ञानासाठी गुरूकडे जावयाचे आहे (श्लोक ८ ). गुरूने त्याला आत्मा आणि अनात्मा याविषयी सांगितले आहे (श्लोक १९ ). त्यातील आत्मा या वस्तूबद्दल मुमुक्षूने तत्परतेने चिंतन करावयास हवे (श्लोक १५). मग आत्म्यैक्य ज्ञान होईल (श्लोक ७). आत्माविषयक चिंतन म्हणजेच मनन हे पुनपुनः सतत केले (अभ्यास) तर ते मनात ठसून राहते.

Tuesday, January 9, 2018

विवेकचूडामणि श्लोक ९ वा

व्यवहारात आपल्यासाठी काही गोष्टी इतरांनी केल्या तरी चालते. पण परमार्थात मोक्षासाठीचा प्रयत्‍न ज्याचा त्यानेच करावयास हवा. 

उद्धरेदात्मनात्मानं मग्न संसार-वारिधौ ।
योगारूढत्वमासाद्य सम्यग्-दर्शन-निष्ठया ॥ ९ ॥

योग्य त्या तत्त्वज्ञानावर निष्ठा विश्वास ठेवून, आणि ज्ञानयोगाचा आधार घेऊन संसाररूपी सागरात बुडालेल्या (मग्न) स्वतःला (आत्मानं) आपण स्वतःच (आत्मना) उद्धरून न्यावयाचे आहे.

संसार म्हणजे जन्ममरणाचे चक्र. संसारावर येथे सागराचे रूपक केले आहे. जन्ममरणरूपी सागरात आपण गटांगळ्या खात आहोत (श्लोक १४३ ). पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या माणसाला भोपळा, तराफा उपयोगी पडतात. ते आपणास तारतील असा भरवसा हवा. त्याप्रमाणे केवलाद्वैत वेदांत हे योग्य तत्त्वज्ञान आपणास तारून नेईल अशी निष्ठा हवी. मग त्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन आपण संसारसागर तरून जावयाचा आहे. दुसरा कोणी आपणास तारेल ही आशा करू नये. आपणच योग्य तो प्रयत्‍न करावयास हवा. योग्य ते आत्मज्ञान झाले की संसारातून उद्धार होतो (श्लोक ६, ४७, ५८) आणि हे आत्मज्ञान आपणच मिळवावयाचे आहे.

'उद्धरेदात्मनात्मानं 'ही ओळ गीतेतील (६. ५) तत्सदृश ओळीप्रमाणे आहे. 'योगारूढ' हा शब्दही गीतेत (६. ४) येतो. पण गीतेतील योगारूढ हा कर्मयोगारूढ आहे. प्रस्तुत श्लोकात निर्देशिलेला 'योगारूढ' हा ज्ञानयोगारूढ आहे हे लक्षात घ्यावे.