Monday, January 1, 2018

विवेकचूडामणि - श्लोक १ ला


(१) सर्व-वेदान्त-सिद्धान्त-गोचरं तमगोचरम् । 
गोविंद परमानंद सद्‌गुरु प्रणतोऽस्म्यहम् ॥ १ ॥ 

 वेदान्ताच्या सर्व सिद्धान्तांना गोचर असणारा, परंतु इंद्रिये, अन्य शास्त्रे इत्यादींना गोचर नसणारा, श्रेष्ठ आनंद हे स्वरूप असणारा, असा जो माझा प्रसिद्ध सद्‌गुरु गोविंद, त्याच्यापुढे मी नम्र झालो आहे. गोविंद नामक सद्‌गुरूपुढे नम्र होऊन आणि त्याला वंदन करून शंकराचार्यांनी येथे मंगल केले आहे. गोविंद ऊर्फ गोविंदयति हे शंकराचार्यांचे गुरू होते. ग्रंथारंभी मंगल केल्यामुळे ग्रंथ निर्विघ्नपणे तडीस जातो अशी पारंपरिक समजूत होती. तिला अनुसरून शंकराचार्यांनी येथे मंगल श्लोक दिला आहे. परमार्थात सद्‌गुरू हा ब्रह्मरूप मानलेला आहे. ''गुरुः साक्षात् परं ब्रह्म''हे त्याचे खरे स्वरूप आहे, लौकिक शरीर हे त्याचे सत्य स्वरूप नव्हे. ब्रह्म हे सच्चित् आणि परमानंद स्वरूपाचे आहे. येथे ''परमानंद ''गुरू असे म्हणून सद्‌गुरू व ब्रह्म यांचे ऐक्य शंकराचार्यांनी दाखविले आहे. गुरू म्हणजे अज्ञानरूपी अंधकार दूर करणारा प्रकाश. सद्‌गुरू म्हणजे सत् स्वरूप ब्रह्माचे दर्शन शिष्याला घडविणारा असा अर्थ आहे. येथे गोविंद शब्दाने सगुण तसेच निर्गुण ब्रह्म सूचित होते. व्यावहारिकदृष्ट्या शंकराचार्यांना सगुण ब्रह्म/ईश्वर मान्य आहे. या ईश्वराचे उल्लेख या ग्रंथात पुढे येतात (श्लोक ३, २३५, ४४७, इत्यादी) सद्‌गुरू हे सगुण-निर्गुण ब्रह्म हे अगोचर आहे. गोचर म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानाच्या टप्प्यात येणारे, अगोचर म्हणजे तसे नसणारे. ब्रह्म हे सगुण असो अगर निर्गुण असो, ते इंद्रियांना कळणारे नाही. तरी सद्‌गुरू/ब्रह्म हे वेदांताच्या म्हणजे उपनिषदांच्या सिद्धांतांना गोचर आहे म्हणजे उपनिषदांतील सिद्धांतावरून ब्रह्म हे कळून येणारे आहे. येथे वेदान्त म्हणजे उपनिषद. उपनिषदे ही वेदाच्या अंत भागी येत असल्याने त्यांना वेदान्त म्हणतात. या उपनिषदांत अनेक ऋषी-मुनींनी ब्रह्माचे ज्ञान दिलेले आहे. उदा., 'ब्रह्म हे सत्य, ज्ञान, अनंत आहे', 'ब्रह्म सह्यिदानद आहे', 'ईश्वर हा जगत्कर्ता आहे', इत्यादी उपनिषदांतील वचनांवरून ब्रह्माचे शाब्दिक ज्ञान होते. वेदांताखेरीज इतर शास्त्रांवरून ब्रह्माचे ज्ञान होत नसल्याने ते त्यांना अगोचर आहे. तसेच प्रत्यक्ष, अनुमान इत्यादी ज्ञानाच्या लौकिक प्रमाणांनी ब्रह्म कळत नाही; त्यांनाही ते अगोचर आहे. या मंगल श्लोकात 'विवेकचूडामणि' या ग्रंथाचे तसेच केवलाद्वैत वेदांताचे चार अनुबंध सुचविले आहेत असे काहीजण म्हणतात. अनुबंध म्हणजे एखाद्या शास्त्राचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आवश्यक मानले गेलेले चार घटक पुढील प्रमाणे : (१) अधिकारी : त्या त्या शास्त्राचा अभ्यास करण्याची पात्रता असणारा जिज्ञासू, (२) विषय : त्या शास्त्राचा विषय, (३) संबंध : शास्त्राचा विषय आणि ग्रंथ यात संबंध असणे. उदा. शरीर हा शरीरशास्त्राचा विषय; पृथ्वी हा शरीरशास्त्राचा विषय नव्हे, (४) प्रयोजन : त्या शास्त्राच्या अध्ययनाने प्राप्त होणारे फळ. या श्लोकात 'प्रणत पुरुष' हा अधिकारी मानावयास हवा, 'सद्‌गुरू परमानंद आहे' या वाक्यावरून जीव-ब्रह्मैक्य हा विषय सूचित होतो (श्लोक ५८ पहा ). 'परमानंद प्राप्ती' हे प्रयोजन आहे (श्लोक ४६). विषयाचे प्रतिपादन करणारा विवेकचूडामणि हा ग्रंथ असल्याने, 'प्रतिपाद्य-प्रतिपादक' असा संबंध येथे आहे. हे चारही अनुबंध या मंगल श्लोकात आहेत हे दाखविण्यासाठी शब्दार्थांची ओढाताण करावी लागते हे मात्र खरे.

No comments:

Post a Comment