Sunday, January 7, 2018

विवेकचूडामणि श्लोक ७ वा

यावर कुणीतरी म्हणतो - द्रव्याने सर्वकाही मिळते. तसेच कर्मे केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात. ''प्रयत्‍ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'' असे म्हणतात. म्हणून द्रव्य म्हणा अथवा कर्म/प्रयत्‍न म्हणा, या उपायांनी मोक्ष मिळेल. ज्ञानाने मोक्ष मिळतो असा अट्टाहास कशासाठी ? याला उत्तर असे - 

अमृतत्वस्य नाशास्ति वित्तेनेत्येव हि श्रुतिः ।
ब्रवीति कर्मणो मुक्तेरहेतुत्वं स्फुटं यतः ॥ ७ ॥

द्रव्याच्या योगाने मोक्षाची (अमृतत्व) आशा नाही, तसेच कर्म हे मुक्तीचे कारण नाही, असे श्रुतीने स्पष्टपणे सांगितलेले आहे.

श्रुती म्हणजे वेद. वेद ऋषींना ऐकू आले. म्हणून त्यांना श्रुति असे म्हणतात. वेदाचे कर्मकांड आणि ज्ञानकांड असे दोन भाग आहेत. तत्त्वज्ञानाची चर्चा करणारे आरण्यक आणि उपनिषदे हे भाग ज्ञानकांडात येतात. केवलाद्वैत वेदांतात प्रायः श्रुति-शब्दाने उपनिषदे अभिप्रेत असतात. केवलाद्वैत वेदांताच्या दृष्टीने श्रुती हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. ही श्रुतीच सांगते की, द्रव्य आणि कर्म यांनी मोक्ष मिळत नाही. श्रुती ही आप्तवचनाप्रमाणे आहे. आप्ताचे वचन आपण खरे मानतो. तसे श्रुतीचे वचन खरे असते असेच आपण समजावयास हवे.

पैशानेच जर मोक्ष मिळत असता तर जगातील सर्व पैसेवाले मुक्त झालेले दिसले असते; पण तसे दिसत नाही. तसेच केवळ कर्मांनी मोक्ष साध्य असता तर दिवसाकाठी २०-२० तास काम करणारे सर्वजण मुक्त झाले असते. पण तसेही दिसत नाही. म्हणून द्रव्य आणि कर्म यांनी मोक्ष मिळत नाही असे श्रुती सांगते. 

येथे 'मोक्ष' दाखविण्यासाठी श्रुतीने 'अमृतत्व' शब्द वापरला आहे. अमृतत्व म्हणजे पुनः न मरणे म्हणजे पुनः जन्मास येऊन न मरणे म्हणजेच जन्म-मरणाचा अभाव म्हणजेच जन्ममरणरूपी संसारातून सुटका म्हणजेच मोक्ष. ब्रह्माशी एकरूप होणे हाच मोक्ष आहे. (ब्रह्मभावश्च मोक्षः । ) आणि हा मोक्ष माणसाने चालू जीवनात मिळवावयाचा आहे. तसे झाले तर तो कृतार्थ होतो.

या श्लोकात अभिप्रेत असणारी श्रुती वचने पुढीलप्रमाणे आहेत : -

(१) अमृतत्वस्य तु नाशास्ति वित्तेन । (बृहदारण्यक उपनिषद, २.४.२), (२) न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः । (तैत्तिरीय आरण्यक, १०, १० ).

No comments:

Post a Comment